BIRTHADAY SPECIAL! "सहकार सेवाव्रती" म्हणजे काय असत हो..? चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीशजी गुप्त यांची ही प्रेरणादायी कहाणी वाचाच!
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आज,६ ऑक्टोबर..! सहकार सेवाव्रती, चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष श्री सतीशजी गुप्ता यांचा आज जन्मदिवस! काकांचा वाढदिवस म्हणजे सहकार, कृषी, शिक्षण, राजकारण, समाजकारण..सर्वच क्षेत्रातील त्यांच्या स्नेह्यांसाठी पर्वणीच..! काकांच्या जन्मदिनानिमित्त सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणादायी ठरेल असे त्यांच्याविषयी थोडेसे..!(काकांचे कामच एवढे मोठे आहे की "आढावा" लेखाजोगा यासारखे शब्दही तिथे अपुरे पडतात)
६ ऑक्टोबर १९५६ हा सहकार सेवाव्रती सतीशजी गुप्त यांचा वाढदिवस. सामाजिक कार्याचे बाळकडू त्यांना जन्मतःच मिळाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक स्व. भगवानदासजी गुप्त हे सतीशजींचे वडील. त्यांच्या तालमीत सतिशजींची जडणघडण होत होती. प्राथमिक ते १२ वी पर्यंत त्यांचे शिक्षण चिखलीत झाले. त्यासोबतच संघ स्वयंसेवक म्हणून त्यांच्या सामाजिक कार्याची जडणघडण होत होती. पुढे उच्च शिक्षणासाठी सतीशजी अकोल्याला गेले, तिथे डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात त्यांनी कृषी विज्ञान मध्ये स्नातक पदवी प्राप्त केली. आपल्या शिक्षणाचा उपयोग हा समाजासाठी झाला पाहिजे यासाठी त्यांनी परिसरात शेतीचा विकास करण्यावर लक्ष केंद्रित केले. ते स्वतः ख्यातनाम ,प्रगतिशील शेतकरी झालेच याशिवाय इतर शेतकऱ्यांना सुद्धा त्यांनी मार्गदर्शन करून प्रगतिशील शेतकऱ्यांची संख्या वाढवली.
विशेष म्हणजे बुलडाणा जिल्ह्यातील फळबागा कशा वाढवता येतील यावर भर देऊन डाळिंब उत्पादनात भरघोस वाढ करून डाळींबाला जागतिक बाजारपेठ कशी मिळवून देता येईल यासाठी ते सदैव प्रयत्नशील असतात. शेतीचा विकास साधायचा असेल तर पाण्याचे स्रोत वाढविण्याशिवाय पर्याय नाही म्हणून पाण्याचे स्रोत जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी असिमित परिश्रम घेतले. या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने पाणलोट मित्र हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. पुढे त्यांचा सहकाराशी ऋणानुबंध जुळला आणि अल्पावधीत आगळ्या वेगळ्या कार्यशैलिने सहकार क्षेत्रात त्यांनी ठसा उमटविला. सहकार क्षेत्र हे समाजाच्या सेवेसाठीच असते, समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी सहकार क्षेत्राचा उपयोग केला म्हणूनच ते सहकार सेवाव्रती ठरले.
अध्यक्ष कसे असावेत..,!
सतीशजी ५ वर्षांचे असताना १९६१ मध्ये त्यांचे वडील स्व. भगवानदासजी उर्फ लालाजींच्या मार्गदर्शनात चिखली अर्बन बँकेची सुरुवात झाली. त्यानंतर अनेक नागरी सहकारी बँकांची स्थापना झाली. सतीशजींची बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या कार्यशैलीने आज, चिखली अर्बन बँकेची संपूर्ण महाराष्ट्राभर ओळख निर्माण झाली. २१ व्या शतकातील सहकार चळवळीचा महत्वाचा कार्यकर्ता किंबहुना अद्वितीय सहकार सेवक म्हणून त्यांची संपूर्ण महाराष्ट्रभर ओळख आहे. सहकार चळवळ आणखी घट्ट व्हावी आणि चळवळीची समाजाशी असलेली नाळ कधीच तुटू नये यासाठी सतीशजी सदैव प्रयत्नशील असतात. एका नागरी सहकारी बँकेचा अध्यक्ष कसा असावा याचा आदर्श वस्तुपाठ सतीशजींना आपल्या कार्यातून घालून दिला आहे.
समाजातील शेवटच्या घटकापर्यंत..!
बँकांचे समाजातील स्थान यावर पुरेपूर लक्ष केंद्रित करून सतीशजींनी आपले कार्य सुरू ठेवले आहे.समाजातील शेवटच्या घटकापर्यंतचे अर्थसहाय्य असो वा देशाच्या प्रगतीचा कणा असलेल्या महिलांचे सबलीकरण असो यासाठी सतीशजी सतत झटत असतात. चिखली अर्बन बँकेच्या माध्यमातून ३५ हजारांपेक्षा जास्त महिलांना अर्थसहाय्य करून महिला सबलीकरणाचा आदर्श त्यांनी घालून दिला आहे. युवाशक्तीला अर्थसहाय्य केल्यास देशाच्या प्रगतीला हातभार लागेल म्हणून ३५ कोटीपेक्षा अधिकचे अर्थसहाय्य त्यांनी उपलब्ध करून दिले आहे.
शिक्षण ,राजकारणातून समाजसेवा...!
शेती आणि सहकाराव्यतिरिक्त सतीशजींनी राजकीय तसेच शैक्षणिक क्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे. चिखली नगरपरिषद, जिल्हा परिषद पंचायत समित्या, विधानसभा, लोकसभा या निवडणुकांच्या नियोजनात सतीशजी अग्रस्थानी असतात. त्यांच्या मार्गदर्शनात अनेकांनी राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटवला,त्यामुळे अनेक लोकप्रतिनिधी सतीशजींना गुरुस्थानी मानतात. त्यामुळेच बुलडाणा जिल्ह्यात राजकीय क्षेत्रातील किंगमेकर म्हणून काकांची ओळख आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुद्धा शहरी भागातील विद्यार्थ्यांना मिळणारे उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून सतीशजींनी चिखली अर्बन विद्यानिकेतन या सी.बी.एस.ई शाळेची त्यांनी २०१४ ला स्थापना केली. आज या शाळेत ९०० पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे अल्पावधीत शाळेतील विद्यार्थी राज्यस्तरावर गुणवत्ता यादीत झळकले आहेत. सहकार कृषी शिक्षण हे सामाजिक उन्नतीचे खांब सशक्त व्हावेत या करीता अविरत झटणाऱ्या निष्काम सेवाव्रती काकांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!