अरेच्चा ! माकडाने न्यायासाठी चक्क न्यायालय गाठले अन् त्याला न्याय मिळालाही!  त्याचे माकडचाळे नव्हतेच, त्याला हवी होती वेदनेवर फुंकर; वाचा चिखलीच्या न्यायालयात काय घडल..

 
बुलडाणा (प्रशांत खंडारे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आज नाती दुरावत चालली.माणुसकी शोधून सापडत नाही.कुणाला कुणाचे घेणेदेणे नाही.न्याय मिळणे तर दुर्लभ झाले.अशात पशु पक्षांची काय बिकट अवस्था असेल? हा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे. परंतु आज चिखली दिवाणी न्यायालयाच्या आवारात घडलेली घटना पशुदयेचा परिचय देणारी ठरली. हात निकामी झालेल्या एका माकडाने आपल्याला न्यायालयातच न्याय मिळणार म्हणून चक्क चिखली येथील दिवाणी न्यायालय गाठले आणि त्याला न्याय देखील मिळाला आहे.

           

माकड चेष्टा, माकडलीला असे शब्दप्रयोग अनेक वेळा होतो. बुलडाणा जिल्हा जंगलव्याप्त असल्याने येथे वन्यप्राण्यांचा वावर असतो. ग्रामीण भागात म्हणा की शहरी भागात हे वन्य प्राणी खाद्य किंवा पाण्याच्या शोधार्थ मानवी वस्तीकडे वळतात. वन्य प्राण्यांपैकी शहरी भागात माकडांच्या उपद्रवाने अनेक नागरिक त्रस्त आहेत. छपरावर,टीनावर, स्लॅबवर किंवा परसबागेतील झाडावर त्यांचा हैदोस डोकेदुखी ठरतो. परंतु आज १३ जानेवारीला एक हात निकामी झालेल्या माकडाने चक्क  चिखली येथील दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर परिसरात 'माकड उड्यांनी' अनेकांना हैराण केले.

त्याचा हात निकामी असल्याने त्याला बहुतेक इजा होत असावी. वेदनेने तो  विव्हळत असावा मात्र अनेकांना त्याचे दुःख दिसले नाही. अनेकांना हे माकड नुसते चाळे करीत असल्याचे दिसले. दरम्यान स्वप्निल शेळके या कर्मचाऱ्याने  सर्पमित्र एसबी रसाळ यांना ही बाब कळविली. त्यांची टीम घटनास्थळी पोहोचली. या माकडाचा एक हात निकामी झाल्याचे दिसून आले. भूषण उकर्डे व निनाद डांगे यांनी जखमी माकडाला येथील वन्यजीव संरक्षण कार्यालयात उपचारार्थ दाखल केले. या वेदनेवर उपचाराची ही फुंकर पशुदया अधोरेखित करणारी ठरली. आणि अखेर त्या माकडाला न्यायदेवतेच्या दरबारात न्यायही मिळाला...