रामा रिसॉर्टच्या ट्रान्सफॉर्मरमधून ४०० लिटर ऑईल चोरी; ट्रान्सफॉर्मर जळून नादुरुस्त, चिखली पोलिसांत तक्रार दाखल.

 
 चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : चिखली शहरातील MIDC परिसरात ट्रान्सफॉर्मरमधून तब्बल ४०० लिटर ट्रान्सफॉर्मर ऑईल चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. रामा ट्रॅक्टर्सच्या मालकीच्या रामा रिसॉर्ट, प्लॉट क्रमांक P-43 येथील विद्युत ट्रान्सफॉर्मरमधून अज्ञात व्यक्तीने ऑईल काढून नेल्याचा संशय असून, या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रान्सफॉर्मरमधील ऑईल चोरीला गेल्यामुळे ट्रान्सफॉर्मरचे मोठे नुकसान झाले असून तो जळून नादुरुस्त झाला आहे. पोलिस नोंदीमध्ये चोरी झालेल्या सुमारे ४०० लिटर ऑईलची किंमत अंदाजे ५० हजार रुपये नमूद करण्यात आली आहे. तर रामा ट्रॅक्टर्सच्या माहितीनुसार संबंधित ट्रान्सफॉर्मरची अंदाजे किंमत ५ लाख ५० हजार रुपये आहे. त्यामुळे ऑईल चोरीसोबतच ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे.

घटना निदर्शनास आल्यानंतर रामा ट्रॅक्टर्सच्या वतीने चिखली पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. अज्ञात व्यक्तीने ट्रान्सफॉर्मरमधील ऑईल काढून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील उपलब्ध CCTV फुटेज तपासणे, तसेच चोरीच्या ऑईलचा आणि नादुरुस्त झालेल्या ट्रान्सफॉर्मरचा शोध घेऊन संबंधित अज्ञात व्यक्तीचा माग काढण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. चोरीला गेलेले ऑईल आणि ट्रान्सफॉर्मरच्या नुकसानीप्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रामा ट्रॅक्टर्सच्या वतीने करण्यात आली आहे.या घटनेमुळे MIDC परिसरातील सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला असून, ट्रान्सफॉर्मरमधील एवढ्या मोठ्या प्रमाणातील ऑईल नेमके कधी आणि कशाप्रकारे चोरीला गेले, याचा तपास पोलिसांसमोर महत्त्वाचा ठरणार आहे.