शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शेवटच्या दिवशी २० उमेदवारांची २९ नामनिर्देशनपत्रे दाखल; ३१ उमेदवार रिंगणात, ९ ऑक्टोबरनंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार...​​​​​​​

 
 अमरावती (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला मंगळवार, ६ ऑक्टोबर रोजी पूर्णविराम मिळाला. नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल २० उमेदवारांनी २९ नामनिर्देशनपत्रे दाखल केली, तर दोन व्यक्तींनी सहा नामनिर्देशनपत्रे उचलली. त्यामुळे आतापर्यंत नामनिर्देशनपत्रे दाखल केलेल्या उमेदवारांची एकूण संख्या ३१ झाली आहे.

शेवटच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे दाखल करणाऱ्यांमध्ये सुमित सुरेशराव पवार (अपक्ष), उपेंद्र बाबाराव पाटील (शिवसेना व अपक्ष), संगीता सचिंद्र शिंदे-बोंडे (भाजप व दोन अपक्ष), विनोद प्रल्हाद कडू (अपक्ष), दिलीप भीमराव कडू (अपक्ष), सजील खान खलील खान (अपक्ष), श्रीकृष्ण सूर्यभान पहुरकर (अपक्ष), अदिती ऋषिकेश पोहरे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व तीन), भोयर चंद्रशेखर ऊर्फ शेखर मनोहरराव (भाजप व अपक्ष), प्रा. डॉ. संतोष श्रीकृष्ण हुशे (अपक्ष), नितीन सुभाषराव आगे (अपक्ष व तीन), प्रिती हर्षल रेवणे (राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टी व अपक्ष), गजानन रामचंद्र उल्हे (अपक्ष), मिलिंद तुकाराम ब्राह्मणे (अपक्ष), किरण अर्जुन चौधरी (अपक्ष), हेमलता दिलीपसिंग मुनोत (अपक्ष), किरण अर्जुन पवार (अपक्ष), राजेशकुमार शालिग्राम कड (अपक्ष), प्रा. अनिल मधुकरराव काळे (बळीराजा पार्टी) आणि रामदास संपतराव कटक (अपक्ष) यांचा समावेश आहे.

दरम्यान, आता निवडणूक प्रक्रियेत पुढील महत्त्वाचा टप्पा म्हणजे नामनिर्देशनपत्रांची छाननी. बुधवार, ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त, अमरावती विभाग यांच्या कार्यालयातील सभाकक्ष क्रमांक २, तळमजला, विभागीय आयुक्त कार्यालय, कॅम्प, अमरावती येथे छाननी प्रक्रिया पार पडणार आहे.

छाननीनंतर उमेदवारी मागे घेण्याची संधी उमेदवारांना मिळणार आहे. उमेदवारी मागे घेण्याबाबतची सूचना शुक्रवार, ९ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त, अमरावती विभाग किंवा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहआयुक्त (सामान्य प्रशासन), विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती यांच्याकडे देता येणार आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार ही प्रक्रिया पार पडत असून, छाननीनंतर प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवार राहणार, याकडे आता अमरावती विभागातील शिक्षक मतदारांचे लक्ष लागले आहे.