पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीवर १२ लाखांचा डल्ला; ग्रामसेवक गणेश पायघन निलंबित; कोलवड ग्रामपंचायतीत मोठा भ्रष्टाचार उघडकीस...
कोलवड ग्रामपंचायतीत कार्यरत असलेल्या गणेश पायघन यांच्याविरोधात विविध तक्रारी प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने चौकशी समिती स्थापन केली. समितीने केलेल्या सखोल तपासणीत पंधराव्या वित्त आयोगातून प्राप्त निधीचा गैरवापर व अपव्यय केल्याचे स्पष्ट झाले. बुलढाणा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी (पंचायत) यांनी दप्तर तपासणी करताच एकामागोमाग एक भ्रष्टाचाराचे प्रकार समोर आले.
गणेश पायघन यांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागविण्यात आला होता. त्यांनी ६ जानेवारी २०२६ व २२ जानेवारी २०२६ रोजी दोन वेळा खुलासे सादर केले. मात्र या खुलास्यांमधूनही ते आपला भ्रष्टाचार लपवू शकले नाहीत. चौकशीत दोषी आढळल्याने महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम, १९६७ मधील कलम ३ चा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली असून निलंबनाचे आदेश देण्यात आले आहेत.
चौकशी अहवालानुसार पंधराव्या वित्त आयोगातून खर्च दाखवलेली रक्कम प्रथम संबंधित पुरवठादारांच्या खात्यात जमा करण्यात आली. त्यानंतर त्या वेंडरच्या खात्यातून ग्रामसेवक गणेश पायघन यांनी तब्बल ११ लाख ५५ हजार रुपये स्वतःच्या तसेच नातेवाइकांच्या बँक खात्यांत वर्ग केल्याचे बँक स्टेटमेंटवरून सिद्ध झाले आहे.
पंधराव्या वित्त आयोगांतर्गत ज्या कामांसाठी देयके अदा करण्यात आली, त्या कामांची नोंद नमुना क्रमांक ५ मध्ये आढळून आली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष कामे न करता बोगस बिले तयार करून खर्च दाखविण्यात आल्याची गंभीर बाबही चौकशीत स्पष्ट झाली. शासनाची फसवणूक व दिशाभूल केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
ग्रामसेवक गणेश पायघन यांच्याकडे लोकसंख्येने मोठ्या असलेल्या रायपूर गावाचाही अतिरिक्त प्रभार होता. त्यांच्या रायपूर येथील कारकिर्दीतही भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे पंचायत विभागात एकच खळबळ उडाली आहे.